आपला इतिहास जिवंत करा

गडवाट… प्रवास सह्याद्रीचा

२०११ पासून सह्याद्रीतील गडकिल्ल्यांचे संवर्धन, इतिहास जतन आणि सामाजिक कार्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था.
p2p

गडवाट संस्था (Gadwat sanstha)

फेसबुकच्या माध्यमातून गडवाट भटकंतीची एकत्र आलेला एक फेसबुक ग्रुप पुढे जाऊन आजमितीस एक सामाजिक संस्था म्हणून नावारूपाला आला. फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन तयार झालेली गडवाट… प्रवास सह्याद्रीचा ही संस्था आपल्या आजूबाजूच्या दुर्ग, किल्ले, ऐतिहासिक स्थळे यांचा शोध, संवर्धन, इतिहासाची ओळख यासाठी कार्य करते. एकत्र येण्याचे उद्दिष्ट एकच – एकमेकांशी जोडले जावे आणि गडवाट परिवार… प्रवास सह्याद्रीचा परिवार तयार झाला.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ही एकमेव प्रेरणा ह्या परिवाराला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आहे. छत्रपती शिवरायांच्या समाजकार्यातील विचारांचा वारसा जपण्याचा वसा ह्या परिवाराने घेतला असून प्रत्येक सदस्यामध्ये सामाजिक बांधिलकी वाढवणे.

गडवाट प्रवास सह्याद्रीचा ही एक सरकारी नोंदणीकृत संस्था आहे. गडवाट संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात तसेच कार्यरत आहे. ऐतिहासिक दिनविशेष विविध उपक्रमातून साजरे करणे हे गडवाटचे वैशिष्ट्य आहे.

गडवाट संस्थेची उद्दिष्टे

शाळा-कॉलेजच्या जीवनातून बाहेर पडल्यावर ऐतिहासिक दिनविशेषांचा आणि आपला संबंध तुटत जातो. जेणे करून पुढे नव्या पिढीला आपल्या नवसंस्कृतीशी ऐतिहासिकतेशी ही नाळ कायम जुळलेली राहावी म्हणून गडवाट मध्ये ऐतिहासिक दिनविशेष साजरे करण्याचा एक ध्यास घेतला. जिजामाता जयंती, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, हिंदुसम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, शूरवीरांच्या कथा सांगणे तसेच नवपिढीमध्ये समाजोपयोगी उपक्रमांची बीज रोवली जाऊ लागली.

संस्थेचा मूळ उद्देश एक महत्वाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राचे शौर्य गाथेचा आणि किल्ले संवर्धन जनजागृती करणे छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, प्रवास महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची ओळख प्रसारित करणे. शिवजयंती ही चौक-चौकात, कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजात साजरी केली जाते ही परंपराच बंद व्हावी हेच गडवाटचे.

गडवाट आयोजित किल्ले पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩#गडवाट #वर्ष११वे#पावनखिंड#सह्याद्री (1)

गडवाटची ओळख

गडवाट बद्दल माहिती

FB IMG 1698518194145
FB IMG 1760301163382 1024x768

गडवाट… प्रवास सह्याद्रीचा ही संस्था २०११ साली पुणे व मुंबईतील इतिहासप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवराय आणि गडकिल्ल्यांवरील प्रेमातून स्थापन केली.

गडावर नेणारी वाट म्हणजेच “गडवाट”. नव्या पिढीला गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात इतिहासाची जागृती व्हावी हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

आजपर्यंत संस्थेने १५०+ गडकिल्ल्यांवर अभ्यासपूर्ण गडभ्रमंती आयोजित केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक इतिहासकार, दुर्गअभ्यासक आणि अनुभवी मार्गदर्शक सहभागी झाले आहेत

दुर्गसंवर्धनाची सुरुवात

२०१२ साली लोणावळ्यातील लोहगड किल्ला संवर्धनासाठी निवडण्यात आला.
गडावरील अस्ताव्यस्त तोफा सुरक्षित ठिकाणी हलविणे, स्वच्छता मोहीम, जनजागृती फलक लावणे आणि शिवजयंती साजरी करणे अशा उपक्रमांची सुरुवात याच गडावरून झाली.

यानंतर “सह्याद्री स्वच्छता मोहीम” संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली.
अनेक गडकिल्ल्यांवर स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृती उपक्रम करण्यात आले.

गडवाटचा प्रवास

इतिहास, संवर्धन आणि समाजकार्य

महाराष्ट्र हां दुर्गांचा देश आहे. दोन-चार डोंगर उतरून गेल की एखादा डोंगर डोक्याला तट-बुरुजांच शेले-पागोटे बांधून उभा असतो.’ अस ज्येष्ठ भटके-लेखक म्हणतात ते खरच. यातील अनेक दुर्गांनी शिवछत्रपतींच्या चरणाची धुळ सुद्धा आपल्या ललाटी लावली आहे. यांचे स्वातंत्र्य टिकवायला अनेक सह्यपुत्रांनी शूरवीर मावळ्यांनी रक्ताचे सडे शिंपले आहेत त्यांच्या अद्भुत पराक्रमानी हा अखंड सह्याद्री आजही त्यांची थोरवी गातो. ती ऐकू येते..आजही.. कधी घराबाहेर पावल नेउन पहा, या सह्याद्रित जा, फिरा आणि ऐका. आजही हा पुराणपुरुष त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गातो आहे. 

सह्याद्री आणि छत्रपती शिवराय यांच्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होवूच शकत नाही. या वैभवशाली महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर बसवण्याचा अद्वितीय पराक्रम केला तो आपल्या क्रांतीसुर्य छत्रपती शिवरायांनी. स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजी राजांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी आपली हयात या महाराष्ट्रासाठी समर्पित केली. हे महाराष्ट्र राज्य रयतेचे राज्य आहे असे संबोधून अवघ्या जगाला जाणता राजा काय असतो हे दाखवून दिले. बारा बलुतेदार, शेतकरी, कष्टकरी आणि अनेक शूरवीर मावळे यांच्यासोबत स्वराज्याची उभारणी केली. 

Smarnika

स्वराज्य उभारताना महाराजांना सर्वात मोठे योगदान दिले या सह्याद्रीने आणि त्याच्या अंगा खांद्यावर पहुडलेल्या गडकोटांनी. अज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात. “गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’. यावरूनच शिवकाळात गडकोटांना किती अनन्यसाधारण महत्त्व होते हे दिसून येते. 

या गडकोटांचा पाया जरी सातवाहन शिलाहार यादव राजसत्तानी घातला असला तरी छत्रपती शिवरायांनी यावर कळस चढवला असे म्हणायला वावगे ठरणार नाही.  शिवरायांनी गडकिल्ल्यांचे महत्त्व ओळखले होते. ते उत्कृष्ट दुर्गस्थापत्यकर होते. शिलाहार यादव कालीन गडकिल्ल्यांची पुनर्बांधणी करून त्यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ले अधिक बळकट केले. त्यामुळेच मोघलशाही, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या बलाढ्य शत्रूंशी सामना करताना महाराष्ट्रातील एकेक किल्ल्यांनी योगदान दिले.

जसा जसा काळ बदलला तसे गडकिल्ल्यांचे महत्त्व कमी होऊ लागले. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांनी संपूर्ण महाराष्ट्रावर सत्ता गाजवत आपल्या महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवर आगी व सुरुंग लावून त्यांच्या वाटा बंद करून टाकल्या. आणि गडकिल्ले खिळखिळे व ओसाड झाले. असे असले तरी महाराष्ट्रातील प्रत्येक जनमनात शिवराय आणि गडकिल्ल्यांचे प्रेम कमी झाले नाही. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर अनेक शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी हे गडदुर्गांना भेटी देवू लागले. त्यांचे पोवाडे आणि माहिती लेखणीतून लोकांमध्ये प्रसारित करू लागले. श्री. गो नि दांडेकर, श्री. प्र के घाणेकर, श्री. आप्पा परब, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, श्री. भगवान चिले यांसारख्या अनेक ज्येष्ठ दुर्गभटक्यांच्या लेखणीतून गडकिल्ल्यांचे महत्त्व आजच्या पिढीला कळू लागले व तशी लहानथोर लोकांची पाऊले गडकिल्ल्यांकडे वळू लागली. गड जागता राहू लागला. गडाची भग्न अवस्था पाहून अनेक दुर्गभटक्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन करायला सुरुवात केली. तर काहींनी गडभ्रमंतीद्वारे लोकांना गडाचा इतिहास सांगायचे कार्य हाती घेतले. 

आजवर महाराष्ट्रात गडकिल्ल्यांवर काम करणाऱ्या किंवा गडभ्रमंती आयोजित करणाऱ्या अनेक संस्था संघटना तयार झाल्या आहेत. त्यात सोशल मिडिया आल्यानंतर लोकांत जागरूकता वाढली. पण हल्ली 5-6 वर्षांपासून भर पडली ती व्यावसायिक गडभ्रमंती आयोजित करणाऱ्या कंपन्यांची आणि पेव फुटले ते अगदी स्पर्धेचे. 

या संस्था संघटनेतील स्पर्धांना फाटा देऊन एक वेगळाच पायंडा पाडणारी संस्था म्हणजे गडवाट प्रवास सह्याद्रीचा. २०११ साली पुण्या मुंबईत राहणाऱ्या काही मुलांनी छत्रपती शिवराय आणि गडकिल्ले यांच्या प्रेमापोटी एकत्र येऊन गडवाट या संस्थेची स्थापना केली. गडावर नेणारी वाट म्हणजेच गडवाट. नव्या तरुण पिढीला तसेच गडकिल्ल्यांवर कुठलीही आस्था नसताना फक्त मौजमजा म्हणून फिरायला जाणाऱ्या मुलांमध्ये हा अफाट सह्याद्री तसेच गडकिल्ल्यांचे महत्त्व समजून सांगण्यासाठी, गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी, जनमानसात गडकिल्ल्यांची व महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची माहिती पोहोचावी, गडभ्रमंती सोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य हातून घडावे हाच काय तो गडवाट संस्थेचा व सर्व गडवाटकरी सदस्यांचा मूळ उद्देश. 

२०११ सालापासून ते आजपर्यंत संस्थेने जवळपास १५० हून अधिक गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. या गड भ्रमंतीत आजवर अनेक ज्येष्ठ इतिहासकार आणि दुर्गअभ्यासक व्यक्तींचा सहभाग लाभला. किल्ला कसा पाहावा, त्यावरील तटबुरुज, पुरातन वास्तू, शिल्प, मंदिरे यांची माहिती अभ्यासत किल्ला कसा बोलता करावा याकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच किल्ला पाहताना व फिरताना कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याकडे संस्थेच्या सदस्य काटेकोर पालन करत असतात. यामुळेच संस्थेच्या सदस्यांनी ठरवलेल्या नियमावली आणि चोख नियोजनामुळे अजवरल्या सर्व गडभ्रमंती मोहीम यशस्वी पार पडल्या आणि याच गोष्टीमुळे महाराष्ट्रातील कित्येक तरुण लहानथोर व्यक्ती संस्थेशी कायमचे जोडले गेले. यातूनच सुरुवात झाली ती संस्थेच्या गडसंवर्धन कार्याची. २०१२ साली लोणावळ्यातील बहुचर्चित प्रसिद्ध लोहगड किल्ला आम्ही संवर्धनासाठी निवडला. गडावर अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा सुरक्षित जागेवर आणून त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या. गडावर ट्रेकर्स कमी पर्यटकांचाच वाढता वावर असल्यामुळे गडावर पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक चे रॅपर अशांचा ढीगच्या ढीग जमला होता. त्यामुळे किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच येणाऱ्या लोकांना किल्ल्यांचे महत्त्व समजावे व जागरूकता वाढावी म्हणून फलक लावण्यात आले. आणि संस्थेच्या वतीने पहिली शिवजयंती ही लोहगडावर करण्यात आली. यानंतर गडभ्रमंती करत असताना तब्बल २ वर्षे संस्थेने “सह्याद्री स्वच्छता मोहीम” संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात असणाऱ्या गडकिल्ल्यावर राबविण्यात आली. तर २०१४ व २०१५ सालच्या पावसाळ्यात जवळपास २० ते २५ गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. 

गडकिल्ल्यांच्या साठी हे करत असतानाच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 

महाराष्ट्रातील तमाम रयतेचा महत्त्वाचा सण म्हणजेच “शिवजयंती”. पण हल्ली शिवजयंतीला आपण काय पाहतोय तर DJ, लावण्या, कर्णकर्कश आवाजाच्या तालावर नाचणारी व विकृत मानसिकता घेवून चालणारी लोक. अशाच अवैचारिक मानसिकता असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करीत. आपण समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या लोकांसोबत शिवजयंती सण साजरा केला तर ? याच जाणिवेतून संस्थेने २०१३ रोजी पद्मविभूषण श्री. सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील अनाथालयात शिवजयंती साजरी, २०१४ साली सातारा येथील रिमांड होम मधील मुलांसोबत शिवजयंती साजरी करण्यात आली. २०१५ साली नगरमधील सावली या अनाथालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यामुळे इतर संस्थांनी सुद्धा अशा प्रकारची शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली आणि संस्थेकडून एक वेगळाच पायंडा पाडला गेला. 

२०१२-१३ साली तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूनर्शोभिकरण काम असो किंवा वढू येथील संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामासाठी आर्थिक योगदान असो संस्थेने अशा कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. 

२०१४-२०१९ पर्यंत रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात बाजारपेठ ते होळीच्या माळापर्यंत छत्रपती शिवराय यांची शोभायात्रा संस्थेच्या वतीने काढण्यात आली जो मैलाचा दगड ठरला आणि आताच्या घडीला शिवराज्याभिषेक समिती हा उपक्रम राबवित आहे याचा अभिमान वाटतो. 

२०१९ मध्ये सांगली कोल्हापूर भागात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागातील लोकांना मदत तर केलीच परंतु संस्थेने या पुरात नुकसानग्रस्त झालेल्या ९ शाळांना मदत करण्यात आली.

दुर्गम भागातील गाव खेड्यात शिकणाऱ्या मुलांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचावी म्हणून शिवजयंती दिवशी जवळपास ३० हून शाळांना पुस्तकांची ग्रंथ दिंडी देण्यात आली, कॉम्प्युटर देण्यात आले तसेच टीव्ही देण्यात आला. कोविड काळात जितके जमेल त्या त्या गरजू लोकांना आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. 

सावित्री नदीला आलेल्या पुरात चिपळूण शहरात नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबांना भांड्याचे सेट व धान्य देण्यात आले. तसेच शाळेची स्वच्छता करण्यात आली. 

यावर्षी देखील यवतमाळ येथे देखील पूरग्रस्त भागातील गावाला मदत करण्यात आली. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हिवाळी या आदिवासी दुर्गम भागात असलेल्या गावात पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी विहीर आणि तळे खोदण्यासाठी श्रमदान करण्यात आले तसेच पाइपलाइन साठी आर्थिक मदत करण्यात आली. 

गडकिल्ल्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच अपघात झाल्यास जखमी व्यक्तीवर उपचार कसा करावा यासाठी संस्थेतर्फे प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील भास्करगड या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दगडमातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते म्हणून इतर ट्रेकर्स मंडळीना बुरुजाच्या दिशेने किल्ल्यात प्रवेश करावा लागे. किल्ल्याची अशी अवस्था पाहून गडवाटकरी मित्रांनी श्रमदान करून प्रवेशद्वारावरील दगड मातीचा ढिगारा काढून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार मोकळे केले आणि आता ट्रेकर्स या मुख्य प्रवेशद्वारातून गडावर येतात याचा आनंद वाटतो. सातारा येथील भूषणगडावर अशीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली आणि त्यावेळी बाळ शिवराय, मासाहेब जिजाऊ, थोरले बंधू संभाजीराजे आणि शहाजीराजे यांचे एकत्रित असणारे चित्र प्रकाशित करण्यात आले जे सध्या चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. 

या वर्षी शिवजयंतीला नाशिक येथील ऐतिहासिक कांचनबारी परिसरात ज्या ठिकाणी खुद्द शिवरायांनी या युद्धभूमीवर उतरून मोगल सैन्याचा पराभव केला अशा ठिकाणी संस्थेने स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विजयस्तंभ उभारला. ज्येष्ठ इतिहासकार श्री. सेतू माधवराव पगडी यांनी ६० वर्षापूर्वी पुस्तकात लिहून ठेवले होते ते त्यांचे स्वप्न या वर्षी पूर्ण झाले. याप्रसंगी कांचनबारी युद्धप्रसंग चित्राद्वारे प्रकाशित आला. 

तसेच गेल्या ७ वर्षांपासून नववर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या थिमवर आधारित गडकिल्ल्यांच्या फोटोंचे कॅलेंडर आपण लोकांपर्यंत पोहचवित आहोत. ज्यामुळे लोकांना घरबसल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची ओळख होवू लागली आहे. 

गेल्या १५ वर्षातील संस्थेच्या या सामाजिक कार्याचा संक्षिप्त आलेख बराच मोठा असल्यामुळे लेखन विस्तारामुळे इथेच थांबतो. 

कमीत कमी खर्चात ट्रेकचे नियोजन, संस्थेशी आजवर जोडले गेलेले गडवाटकरी सदस्य, अनुभवी ट्रेक लीडर, ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक, प्रसिध्द इतिहासकार यांच्या मार्गदर्शन व विचाराखाली संस्थेची वाटचाल ही चंद्रकोरी प्रमाणे वाढते आहे. सह्याद्री, गडकिल्ले आणि छत्रपती शिवरायांचे विचार हा जनमानसात पोहोचून जागरूकता निर्माण करण्यासाठी गडवाट ही संस्था कटिबध्द आहे. 

धन्यवाद,
सुहास पवार
गडवाट संस्था.

गडवाट प्रवास

गडवाटची सुरुवात २०११ साली झाली, जेव्हा गडकिल्ल्यांवर इतिहास जागरूकता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गडवाटने १५०+ गडकिल्ल्यांना भेट दिली आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

1
गडकिल्ले भेटी
0 +
वर्षांची वाटचाल
0 +
गडवाटकरी सदस्य
0 +

आपली टीम

कार्यकारिणी मंडळ

सुहास पवार सचिन पोखरकर आबासाहेब कापसे अभिजित दरेकर जितेंद्र ताम्हाणे सौरभ मोडक संतोष ठाकूर विशाल अढाव गौरव थोरात अविनाश लोखंडे सतीश कुरपड वैभव बागल अक्षय भावले

ट्रेक लीडर्स

abasaheb kapse (1)

आबासाहेब कापसे

किरण उंबरकर

किरण उंबरकर

सौरभ उफाडे

सौरभ उफाडे

वैभव शिगवण

वैभव शिगवण

संतोष ठाकूर

संतोष ठाकूर

मयूर पवार

मयूर पवार

करण टाकळकर

करण टाकळकर

सुयोग डोळस

सुयोग डोळस

दिपक चव्हाण

दिपक चव्हाण

saurabh modak

सौरभ मोडक

suhas pawar

सुहास पवार

सोशल मीडिया व्यवस्थापक

sachin pokharkar

सचिन पोखरकर

omkar waghmare

ओमकार वाघमारे

jay saner

जय सनेर

Scroll to Top