ऐतिहासिक चित्र
स्वराज्याच्या चार प्रेरणास्तंभांची ऐतिहासिक भेट
शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि बाळ शंभूराजे यांच्या भावनिक आणि ऐतिहासिक क्षणाचे चित्रमय दर्शन. स्वराज्याच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय प्रसंग असून, अनेक वर्षांनंतर एका बाप-लेकाची, आजोबा-नातवाची आणि कुटुंबाची झालेली भावनिक भेट यात साकारली आहे. या चित्रातून स्वराज्याचे संस्कार, कौटुंबिक नाते आणि प्रेरणादायी विचारांचा अमूल्य वारसा जिवंत होताना दिसतो. हे चित्र इतिहासातील संदर्भांवर आधारित कल्पनाचित्र असून, त्या काळातील भावना आणि प्रसंग प्रभावीपणे उभे करते.
Read More
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे , स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ, स्वराज्यनिर्माता छत्रपती शिवराय आणि स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे यांची ऐतिहासिक भेट ठरलेलं कल्पना चित्र.
एखादा वाचक कोणतेही पुस्तक वाचताना, मग ती एखादी गोष्ट असो, दंतकथा असो, कादंबरी, ऐतिहासिक बखर असो किंवा ऐतिहासिक चरित्र ग्रंथ असो. त्याच्या समोर लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक प्रसंग, कथानक आणि संदर्भाचे डोळ्यासमोर चित्र उभे राहतेच.. ऐतिहासिक दस्तऐवज आणि संदर्भ वाचताना बऱ्याचशा महत्वाच्या घटना लेखकांनी, बखरकारांनी संदर्भासहित शब्दबद्ध करून ठेवलेल्या असतात. त्यातील काही प्रसंग ते चित्रातून लोकांसमोर मांडतात. गडवाट संस्थेने असाच एक प्रसंग प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद मोर्ती यांच्या सहकार्याने चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे शाहजीराजे, जिजाऊ, शिवराय आणि बाळ शंभुराजांच्या शेवटच्या भेटीचा…
ऐतिहासिक संदर्भ
१) चिटणीसांचे ‘श्रीशिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’
मल्हार रामराव चिटणीस यांनी साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेवरून १८१०-११ च्या सुमारास लिहिलेले ‘श्रीशिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’ ही ऐतिहासिक बखर आहे. सात प्रकरणांमध्ये शिवरायांचे आयुष्य, राज्यव्यवस्था व पराक्रम सांगणारी ही बखर (चिटणीस बखर) तत्कालीन ऐतिहासिक माहितीसाठी महत्त्वाची असली आणि काही ठिकाणी ती तर्कनिष्ठ वाटत नसली तरी त्यातील काही संदर्भ हे ऐतिहासिक तथ्य आहेत. या बखरीमधे चौथ्या प्रकरणात त्यांनी राज्यमर्यादास्थापन आणि पितृदर्शन (शाहजीराजे व छत्रपती शिवरायांची भेट) याबाबत सविस्तर लिहिले आहे.
२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शोधून काढलेली कवी जयराम पिंडे यांची “राधामाधवविलासचंपू” या ग्रंथातील सविस्तर प्रस्तावना.
प्रस्तावना लिहिताना या ऐतिहासिक भेटीचा उल्लेख केलेला आढळतो. कवी जयराम पिंडे हे शहाजीराजेंच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी या ग्रंथात अकरा प्रकरणे लिहिली असून शहाजी महाराजांची पराक्रमी कारकीर्द, शिवाजी महाराज, संभाजीराजे व जिजाऊंविषयी महत्त्वाची ऐतिहासिक माहिती सापडते. मुळात हा ग्रंथ म्हणजे शाहजी राजांचा चरित्रग्रंथच होय. कवी जयराम पिंडे यांनी हा ग्रंथ सन १६५४ मधे लिहिला असावा असे सांगितले जाते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
शहाजीराजे आणि शिवराय यांच्या भेटीवर आधारित वर फक्त दोन संदर्भ दिले आहेत. राजगडावरील पद्मावती माचीला असलेल्या जिजाऊंच्या वाड्यातील भेटीचा प्रसंग असलेले हे चित्र कल्पना चित्र असले तरी वाचनात आलेल्या काही निवडक उल्लेखावरून आणि तत्कालीन सनावळी, ऐतिहासिक घडामोडी यांचा आधार घेऊन तयार केलेले आहे.
आदिलशाही सरदार अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची कीर्ती या काळात देशभर पसरली होती. स्वराज्यविस्तार वाढला होता. अशातच शाहिस्तेखान याने १६६० साली स्वराज्यावर हल्ला केला व पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला होता. याचवेळी शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते तो प्रसंग.
आदिलशाह आणि औरंगजेबाने केलेल्या अशा कोंडीत बंगळूर ला असणाऱ्या एका पित्याला आपल्या पुत्राची काळजी वाटत असणारच. चिटणीस बखरीतील उल्लेखानुसार शाहजीराजांनी आदिलशाहास निरोप पाठवला “बहुत दिवस झाले कुलस्वामीचे दर्शन घेण्यास गेले पाहिजे” तेव्हा पातशाहानी सांगितले “तुम्ही जाता, तुमचे पुत्र आफरी होवून वर्ततात, त्यास बहुत प्रकारे बोध करून भेटीस आणावे, त्यांनी तुमचे रीतीने पातशाहीतील अमार चालीने चालावे, आले असता वजिरी सांगोन सर्व पातशाहात त्यांचे स्वाधीन करून सेवा घेता येईल, म्हणोन शिवाजी राजे आपलेसे होवून राजकारण लावावे” असे सांगितले असता शाहजी महाराज यांनी “पुत्र आपले स्वाधीन आहेत नाहीत याची खातरजमा पूर्वी जाली आहे, तत्रापी प्रयत्न तितका करून पाहातो, आम्हास आपणावाचून अन्य प्रकार नाही, कुलस्वामीचे दर्शन घेवून पुत्राचीही भेटी घेवून, चार गोष्टी विचाराच्या सांगोन आज्ञेत चालावे ऐसे करून पाहातो” म्हणून उत्तर पाठवले. तेव्हा पातशाहाने “जावून करून पाहावे, जाल्यास उत्तम, नाही तरी तुम्ही त्यात मिळोन राहू नये, आमचे आम्हापाशी यावे ऐशी खातरजमा करून शहाजीराजांना महाराष्ट्रात जाण्याची परवानगी दिली.
शहाजीराजे बंगळूरहून निघताना त्यांच्यासोबत तुकाबाईसाहेब, व्यंकोजीराजे देखील महाराष्ट्रात आले असा उल्लेख आढळतो. वरील उल्लेख वाचताना आणि तत्कालीन घडामोडी पाहता शाहजीराजांची ही भेट कुलस्वामीच्या दर्शनाचे निमित्त होते तर जिजाऊ छत्रपती शिवरायांसोबतची भावनिक व एक खास राजकीय भेट असावी असेही दिसून येते.
शहाजीराजे ३ महिने महाराष्ट्रात राहिले असावेत असे बखरीत नमूद केले आहे. तसेच शहाजीराजे यांच्या वयाचा विचार करता फक्त जेजुरीस झालेली भेट ही त्यांची धावती भेट म्हणता येणार नाही. तसेच जेजुरी ते राजगड किल्ल्याचे अंतर पाहता त्यांचा मुक्काम राजगडावरील जिजाऊंच्या वाड्यात झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या भेटीनंतर १६६२ च्या पुढे बऱ्याच ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या आपणास वाचायला मिळतात.
चित्रामागील संकल्पना
या चित्रात महाराष्ट्रातील तमाम जनतेच श्रद्धास्थान असलेल्या चार प्रेरणादायी व्यक्ती म्हणजेच स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ, स्वराज्यनिर्माते छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची एकत्रित भेट दाखवली आहे. १८ वर्षांनंतर एका बाप लेकाची, एका नवरा बायकोची आणि एका आजोबा नातवाची झालेली शेवटची भेट… समाधानी, आनंदी व तितकाच भावनिक क्षण आहे पाहा…
1. थोरल्या संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने अर्थात शिवरायांनी आपल्या मुलाचे नाव ठेवलेल्या बाळ शंभूराजा कडे पाहत शाहजीराजांना शेवटपर्यंत बापाची सावली म्हणून ओळखल्या गेलेल्या पराक्रमी थोरल्या संभाजीराजांची आठवण झाली असेल.
2. शहाजी महाराजांच्या आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलेले ५ वर्षांचे बाळ शंभूराजे. शाहजी महाराज शंभूराजांना कवी जयराम पिंडे यांनी लिहिलेलं “राधामाधवविलासचंपू” या काव्यग्रंथाची भेट देत त्यातील काही काव्य वाचून दाखवत आहेत. शाहजीराजांचा साहित्यप्रेमाचा वारसा शिवरायांनी आणि शंभूराजांनी तसेच तंजावरच्या भोसले घराण्याने पुढे चालवलेला आपणास दिसतो.
3. आपल्या वडिलांना आणि आनंदी आईला इतक्या वर्षांनी एकत्र आणि मनभरून पाहत उभे असलेले छत्रपती शिवराय.
4. बाळ शंभूराजांना आजी सोबतच आजोबांचा काही क्षणांकरिता का होईना एकत्र लाभलेला सहवास
5. शाहजीराजांना शिवरायांनी कौतुकाने दाखवलेला राजगड किल्ला.
एक इतिहास वाचक म्हणून एक अभ्यासू दृष्टीने साधा, सरळ आणि प्रामाणिकपणे मांडलेला विचार हा या चित्रामागील महत्त्वाचा आशय आहे.
हे चित्र तयार करताना अनेक जणांचे सहकार्य लाभले. सर्वप्रथम गडवाट संस्थेचे लाडके सुप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद मोर्ती यांचे मनापासून आभार आणि कौतुक. हे चित्र साकारण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे.
त्याचबरोबर काही ऐतिहासिक संदर्भ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे माझे मित्र विक्रांत गायकवाड, प्रवीण मोहिते, सचिन पोखरकर यांची मदत लाभली. तसेच दुर्गतपस्वी श्री. आप्पा परब, इतिहास अभ्यासक श्री. अजयदादा जाधवराव आणि दुर्ग अभ्यासक श्री. भगवान चिले सरांच मार्गदर्शन लाभले.
हा प्रयत्न इतिहासाची विडंबना करण्यासाठी नसून, उपलब्ध संदर्भांच्या आधारे एक अभ्यासू, प्रामाणिक आणि संतुलित चित्रण करण्याचा आहे. इतिहास अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचावा, भविष्यात या विषयावर पुस्तके, व्याख्याने किंवा सादरीकरणे व्हावीत—हीच या चित्रामागील प्रमुख भावना आहे.
२०२६ च्या शिवजयंती च्या निमित्ताने या चित्राचे अनावरण करण्यात आले.
कांचनबारीच्या रणभूमीवरील स्वराज्याचा पराक्रम
१७ ऑक्टोबर १६७०… रणभूमी कांचनबारी येथील युद्ध.. 🚩
आपल्याला महाराजांच्या लढाईचा इतिहास म्हंटले की आठवते ते फक्त अफझलखान वध, शाहिस्तेखानाची बोटे, पावनखिंड रणसंग्राम, उंबरखिंडीची लढाई..
पण या व्यतिरिक्त ही दुर्लक्षित राहिलेले एक लढाई आहे ज्यात महाराज स्वतः मैदानात हातात पट्टे घालून १० हजार फौजेनिशी लढले आहेत ती लढाई म्हणजे १७ ऑक्टोबर १६७० साली नाशिक जिल्ह्यातील कांचन मांचन किल्ल्याच्या पायथ्याशी कांचनबारीची लढाई 🚩
या लढाई चे वर्णन करताना सभासद म्हणतो की…..
“खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पट्टे चढवून मालमत्ता घोडी, पाईंचे लोक पुढे रवाना करून आपण दाहा हजार स्वारानिशी सडे सडे राऊत उभे राहिले.”
शिवरायांनी स्वतः नेतृत्व केलेल्या निर्णायक लढायांपैकी ही अत्युच्च दर्जाची लढाई आहे.
हे तैलचित्र गडवाट संस्थेने विविध ऐतिहासिक ग्रंथातील संदर्भ तपासून… चित्रकार प्रदीप पवार ( अहमदनगर ) यांच्या कडून तयार करून घेतले आहे
इतिहासातील एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण
शिवजन्म चित्र
राजमाता जिजाऊ, शाहजी राजे, थोरले संभाजीराजे आणि बाळ शिवराय
आजवर शिवकाळापासून ते थोरले शाहू महाराजांच्या काळापर्यंत शेकडो इतिहास कारांनी, इतिहास अभ्यासकांनी भरभरून लिहिले आहे. शिवराय आणि त्यांच्या जीवनावर कित्येक चरित्र ग्रंथ , कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. सर्व उपलब्ध संदर्भ साहित्य आणि साधनात पुरावा असून देखील इतिहासकारांनी आपल्याला हे कुटुंब कधीच एकत्र दाखवलेच नाही.
जास्तीत जास्त जिजाऊ सोबत शिवराय या दोघांचेच एकत्र चित्र आजवर जनमानसात पसरलेले होते. छत्रपती शिवरायांना फक्त आईचाच नव्हे तर वडिलांचा आणि मोठ्या भावाचा देखील काही वर्ष सहवास लाभला होता हेच सत्य आहे.
शिवजन्मापूर्वी आणि त्यानंतरच्या मिळणाऱ्या सर्व घटनावळी आणि अस्सल पुरावे यांचा आधार घेऊन गडवाट संस्थेने २०१७ साली हे चित्र सहकारी गडवाटकरी, इतिहास अभ्यासक मित्र यांच्या मदतीने आणि प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद मोर्ती यांच्या सहकार्याने रेखाटण्यात आणि प्रसिद्ध करण्यात आले.
जे कुटुंब आजवर कोणत्याही इतिहास लेखक, अभ्यासक, संशोधक यांनी एकत्र आल्याचे दाखवले नाही ते स्वराज्यकर्ते भोसले कुटुंब गडवाट संस्थेने चित्र स्वरूपात जगासमोर आणले.
-सुहास पवार
